पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (ड – सर्वसाधारण पुरुष) मधून चेतन महादेव पवार यांनी कोणताही गाजावजा न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेत हा अर्ज दाखल करण्यात आला.
मोठ्या रॅल्या, ढोल-ताशे किंवा घोषणाबाजी टाळत अत्यंत शांत, संयमी आणि शिस्तबद्ध पद्धतीने चेतन पवार यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रवेश केला. यामुळे “राजकारण म्हणजे सेवा” हा संदेश त्यांनी अप्रत्यक्षपणे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत न होता लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेणे हीच खरी लोकशाही असल्याचे चेतन पवार यांनी यावेळी सांगितले. निवडणूक म्हणजे शक्तिप्रदर्शन नव्हे, तर विकास आणि विश्वासाचा करार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
त्यांच्या या सुसंस्कृत आणि जबाबदार भूमिकेमुळे प्रभाग २५ मधील मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असून, आगामी निवडणुकीत हा संयमच त्यांच्या प्रचाराची ओळख ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
