Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वातावरण तापले असून, भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक मधुकर भोंडवे यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘आता बदल घडवायचाच’ या निर्धारासह काढण्यात आलेल्या या रॅलीने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले.

रावेत-गुरुकुल परिसरापासून सुरू झालेल्या या रॅलीत समीर लॉन्सपर्यंत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशे, भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दीपक भोंडवे म्हणाले, “हा अर्ज केवळ कागदाचा नाही, तर प्रभाग १६ च्या सर्वांगीण विकासाची ग्वाही आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि स्वच्छता या सर्व मुद्द्यांवर ठोस काम करणे हेच माझे ध्येय आहे.”

भोंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात यापूर्वी झालेली विकासकामे, तसेच स्थानिक प्रश्नांबाबतची त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत असल्याचे चित्र या रॅलीतून दिसून आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी भोंडवे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

या शक्तिप्रदर्शनामुळे प्रभाग १६ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत असून, आगामी निवडणुकीत ही लढत अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version