पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांना काळेवाडी–ज्योतिबानगर परिसरातून मोठा आणि निर्णायक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ज्योतिबानगर येथील मातृछाया कॉलनी, सूर्यकिरण कॉलनी, चंद्रकिरण कॉलनी, समता कॉलनी तसेच परिसरातील नागरिकांनी एकत्र येत नढे यांच्या प्रचाराला उघड पाठिंबा दिला.
विशेष बाब म्हणजे हनिफ व साहिल ग्रुपच्या माध्यमातून काळेवाडीतील मुस्लिम तरुणांनी विकासाच्या मुद्द्यावरून भाजप उमेदवार विनोद नढे यांना जाहीर पाठिंबा देत सर्वसमावेशक विकासाचा संदेश दिला. धर्म, जात किंवा पक्षीय राजकारणापेक्षा परिसराच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका या तरुणांनी यावेळी मांडली.
या प्रसंगी विनोद नढे यांचे २५ फुटी भव्य दिव्य हार घालून जोरदार स्वागत करण्यात आले. घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे परिसरात राजकीय चैतन्य पाहायला मिळाले. “काळेवाडीच्या विकासासाठी सक्षम, पारदर्शक आणि काम करणारे नेतृत्व आवश्यक आहे,” अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
आपल्या भाषणात विनोद नढे यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले की, “प्रभाग २२ चा विकास हा केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व युवकांसाठी संधी निर्माण करणे हे माझे प्राधान्य राहील.” सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या पाठिंब्यामुळे प्रभाग २२ मधील राजकीय समीकरणांमध्ये भाजपच्या पारड्यात स्पष्टपणे वजन वाढल्याचे बोलले जात असून, येत्या निवडणुकीत विनोद नढे यांची उमेदवारी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
