Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी माजी विरोधी पक्षनेते माननीय नाना काटे यांची सदिच्छा भेट घेत पक्षाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनिती यावर सखोल व सकारात्मक चर्चा केली.

या भेटीदरम्यान प्रभागातील अनुभवी व ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते, स्थानिक जनतेशी दीर्घकाळ थेट संपर्क असलेले अरुण चाबुकस्वार इच्छुक उमेदवार म्हणून उपस्थित होते. त्यांच्या राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि मजबूत जनसंपर्कामुळे प्रभागात त्यांचे प्रभावी स्थान असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढत्या ताकदीस ते पूरक ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

याच वेळी दीपक जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळाली असून प्रभागातील संघटनात्मक बांधणी अधिक सशक्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

या बैठकीत पक्ष जो अधिकृत निर्णय घेईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व इच्छुक उमेदवार एकदिलाने उभे राहतील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पॅनल विजयी करण्यासाठी सर्व शक्तीनिशी काम करण्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी इच्छुक उमेदवार सुमित डोळस, निखिल काळे, विवेक कांबळे, छत्रभुज झाडे, विशाल भालेराव, माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, अमित भालेराव, संदीप पिसाळ, नितीन ओव्हाळ, युवराज प्रगणे, प्रमोद चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना  नाना काटे यांनी,
“येणाऱ्या १६ तारखेला गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल,”असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होऊन नवउत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितच वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version