पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, श्री. संदीप विठ्ठल काटे यांनी थेट मैदानात उतरून नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत जनसंवादाचा आक्रमक धडाका लावला आहे.
घराघरांत, सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यावर थांबून त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, ज्यामुळे प्रभागात नव्या नेतृत्वाची ठोस चाहूल लागली आहे.
या संवादादरम्यान पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पार्किंगची समस्या, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधांचा अभाव या ज्वलंत मुद्द्यांवर नागरिकांनी थेट रोष व्यक्त केला. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे पिंपळे सौदागर परिसर विकासापासून मागे पडल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी श्री. संदीप काटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पालिकेतील कारभार जनतेच्या हितासाठी असायला हवा; केवळ कागदावर योजना राबवून चालणार नाहीत. प्रभाग २८ साठी मूलभूत सुविधा, दर्जेदार पायाभूत विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना थेट न्याय देणारी यंत्रणा उभी करणे हेच माझे ध्येय आहे.” त्यांच्या या ठाम भूमिकेला नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
या प्रत्यक्ष जनसंवादामुळे प्रभागात राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी गोटात अस्वस्थता तर विरोधकांमध्ये नव्या जोमाची लाट पाहायला मिळत आहे. संदीप काटेंच्या आक्रमक आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे प्रभाग २८ मध्ये सत्ता परिवर्तनाची ठळक शक्यता व्यक्त केली जात असून, पिंपळे सौदागरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
