पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाने वर्चस्व सिद्ध करत संपूर्ण प्रभाग भाजपमय केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आक्रमक आघाडी घेतली असून, निवडणूक होण्याआधीच त्यांचा विजयाकडे वेगाने कूच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या काळेवाडी प्रभागात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून आलेले नागरिक वास्तव्यास आहेत. या विविधांगी लोकसंख्येच्या गरजा, मूलभूत नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून विनोद नढे यांनी विशेष विकासात्मक आराखडा मांडला आहे. हाच विकासाचा ठोस अजेंडा नागरिकांच्या मनाला भावत असून, त्याचा थेट फायदा प्रचारात दिसून येत आहे.
दिवसभर प्रभागात घरोघरी भेटीगाठी, कोपरा सभा आणि भव्य प्रचारफेरी काढत विनोद नढे यांनी जनतेशी थेट संवाद साधला. सायंकाळच्या सत्रात कोकणेनगर येथील श्रीकृष्ण कॉलनी क्रमांक ४, नटेनगरमधील ओंकार कॉलनी, महागंगा कॉलनी, कापसे चाळ, श्रीराधेकृष्ण कॉलनी तसेच जय मल्हार कॉलनी परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला.
विशेषतः ओंकार कॉलनीत फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पुष्पवृष्टीत विनोद नढे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा जोश आणि भाजपच्या संघटनात्मक ताकदीमुळे संपूर्ण प्रभागात “भाजपच येणार” अशी ठाम भावना निर्माण झाली आहे.
एकूणच, काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचा प्रचार वेग घेत असून, विनोद नढे यांची आघाडी दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. निवडणूक निकालाच्या आधीच भाजपच्या विजयाची चाहूल लागल्याचे स्पष्ट संकेत सध्याच्या राजकीय वातावरणातून मिळत आहेत.
