Spread the love

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाकड–पिंपळे निलख प्रभाग क्रमांक २६ मधून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते गणेश कस्पटे यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत राजकीय चर्चांना वेग दिला आहे. “दहा वर्षे संयम राखला, पक्षाचा शब्द पाळला; आता मात्र थांबण्याचा प्रश्नच नाही,” असे ठाम शब्दांत सांगत कस्पटे यांनी यंदा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

पत्रकारांशी संवाद साधताना कस्पटे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी पूर्ण तयारी असूनही पक्षाच्या सूचनेनुसार माघार घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. “स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमचे मार्गदर्शक आमदार शंकर जगताप यांच्या शब्दासाठी मी मागे राहिलो. पक्षासाठी काम केले, दिलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी जीव तोडून प्रयत्न केले,” असे त्यांनी सांगितले.

मात्र, आता परिस्थिती बदलली असल्याचे ते म्हणाले. “मी गेली दहा वर्षे या प्रभागात सातत्याने काम करत आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो, प्रशासनाशी संघर्ष केला. आज लोक स्वतः येऊन मला निवडणूक लढवण्याची मागणी करत आहेत. हा लोकांचा आग्रह दुर्लक्षित करता येणार नाही,” असे कस्पटे यांनी स्पष्ट केले.

वाकड प्रभागातील वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांवरील ताण, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि नागरी प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, “फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारा नगरसेवक या भागाला हवा आहे. तो अनुभव आणि तयारी माझ्याकडे आहे.”

आपल्या भूमिकेवर ठाम राहत कस्पटे म्हणाले, “महिला किंवा पुरुष कोणतीही जागा असो, निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. आता निर्णय पक्षाने घ्यायचा आहे, पण कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.”
कस्पटे यांच्या या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे वाकड प्रभागातील भाजपच्या उमेदवारीवरची चर्चा अधिक तीव्र झाली असून, ‘निष्ठा, संयम आणि लोकाग्रह’ या मुद्द्यांवर आधारित नवा राजकीय संदेश पक्षांतर्गत पातळीवर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version