Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या ‘इनकमिंग’ राजकारणाने पिंपरीत थेट बंडाचे स्वर धडकले आहेत. शनिवारी इतर पक्षांतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर, अवघ्या एका दिवसातच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला. रविवारी दुपारी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत आत्मक्लेष आंदोलन केले आणि पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने इतर पक्षांतून तब्बल २२ जणांना पक्षात घेतल्याने स्थानिक पातळीवर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंबईतील प्रवेशानंतर पिंपरीतील काही नेत्यांना दिलेल्या प्रवेशामुळे “आयारामांना संधी, निष्ठावंतांना डावलले” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये पक्की झाली असून, त्याचा थेट स्फोट छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाला.

रविवारी दुपारी संदीप वाघेरे यांच्या समर्थकांनी चौकात मोठ्या संख्येने गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना आणि भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. “आयारामांना थारा नको, निष्ठावंतांना न्याय द्या,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाला थेट इशारा दिला. संदीप वाघेरे जो निर्णय घेतील, त्याला अखेरपर्यंत साथ देण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
संदीप वाघेरे आक्रमक—‘हिंदुत्व माझं डीएनए’
आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संदीप वाघेरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
“मी पैसे कमवण्यासाठी किंवा घर भरण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. समाजातील उपेक्षित घटकांचा विकास करण्यासाठीच मी लढतोय,” असे ठणकावून सांगत त्यांनी काही व्यक्तींच्या पक्षप्रवेशाला आपण आधीच विरोध दर्शवला होता, तरीही तो दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप केला. “आता माझी उमेदवारी कट करण्याचा डाव रचला जात आहे. आजवर सातत्याने मला अडचणीत आणण्याचेच काम झाले,” असा थेट आरोप त्यांनी केला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहत वाघेरे म्हणाले, “हिंदुत्व हेच माझं डीएनए आहे. दगा-फटक्याचं राजकारण करणारी मंडळी आजपर्यंत जनतेला फसवत आली आहेत.” प्रभागातील विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी पिंपळे सौदागर ब्रिज, रेल्वे उड्डाणपूल यांसारख्या कामांना जाणीवपूर्वक विरोध केल्याचा आरोप केला. “ज्यांनी प्रत्यक्ष विकास केला, त्यांनाच बाजूला बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
आक्रमक शैलीत बोलताना त्यांनी उपस्थितांमध्ये जोश भरत म्हटले, “यांची वृत्ती अफजलखानाची असेल, तर मला शिवाजी महाराज व्हावंच लागेल.”
नागरिकांना थेट आवाहन करत वाघेरे म्हणाले, “लोकांची काम करणारे चार नगरसेवक निवडायचे की स्वतःचे हित साधणारे, हा निर्णय तुमच्या हातात आहे. मला साथ द्या, माझ्यासोबत चौघे निवडून द्या. पाच वर्षेच नाही, तर सदैव मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहीन.”

या आक्रमक वक्तव्यांमुळे पिंपरीतील राजकीय वातावरण तापले असून, भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे चव्हाट्यावर आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version