चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी- चिंचवडवासीयांसाठी आणि एकूणच समस्त गणेशभक्तांसाठी दैवत असणाऱ्या महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या 464 व्या महोत्सवाला काल मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. कालच्या पहिल्या दिवसाची सेवा सुगम संगीताच्या रूपाने स्थानिक पण आपल्या दैवी देणगीने नावारूपाला आलेल्या संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले या गायक जोडीने आपल्या सुश्राव्य गायनाने रसिकांना मनमुराद आनंद देत मोरया चरणी रुजू केली
कालच्या या संगीत रजनीसाठी पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, जितेंद्र देव, केशव विद्वांस हे आणि रसिक तसेच यजमान म्हणून संपूर्ण वेळ कार्यक्रमास उपस्थित होते.
मराठी आणि हिंदी अशा मिश्र गाण्यांची मेजवानी रसिकांना पहिल्याच दिवशी अनुभवता आली. एकाहून एक सुंदर आणि अवीट अशी गाणी या दोघांनी सादर करत आपल्या अवीट गायनाची कमाल दाखवली.
तुज मागतो मी आता या गाण्याने या सेवेची सुरुवात झाली, टेलिव्हिजनच्या माध्यमातून अल्पवधीतच लोकप्रिय झालेल्या या गोड गळयाच्या गायिकेने या सुंदर गाण्याने मैफिलीला सुरुवात केली आणि उपस्थित मोरया भक्त रसिकानी या गाण्याला भरभरून दाद दिली. त्यानंतर तिनेच गायलेल्या माय भवानी तुझे लेकरू या गाण्यालाही उत्स्फूर्त दाद मिळाली.
मूळचा आकुर्डीतला पण आता आपल्या जबरदस्त गायनशैलीने भारताचा लाडका गायक झालेल्या संदीप उबाळेने मन मंदीरा या गाण्याने आपल्या गायनाची सुरेख अनुभूती उपस्थित रसिक प्रेक्षकांना दिली. यानंतर ही मैफिल उत्तरोत्तर अतिशय रंगत गेली.
नावाची गोजिरी, मला वेड लागले, देवा काळजी रे, यारा सिली सिली
अभी मुझमे कही, मेरे ढोलना सून, ये राते ये मौसम अशा अनेक अजरामर गाण्याचे सादरीकरण या जोडीने करत ही संगीत रजनी खूप उंचावर नेली .
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या शीर्षकाचा गायक असलेल्या संदीपने छावा हे गीत उभे राहून सादर करताच तमाम श्रोत्यांनी त्याला जोरदार दाद दिली. योगिता गोडबोले हिने कजरा मोहब्बतवाला हे आशाताई आणि शमशाद बेगम यांच्या आवाजातले गाणं एकटीने सादर करत आपल्या प्रतिभेची चुणूक सादर केली.
ही मैफिल कधीच संपू नये असे वाटत होत्या, पुण्यात आता बऱ्यापैकी थंडी पडली असूनही रसिक श्रोते मंडपातून हालत नव्हते पण कुठे तरी थांबावेच लागते या नियमाने संदीपने देवा श्री गणेशा हे गीत भन्नाटरित्या सादर करत संपूर्ण प्रेक्षकांना यात समाविष्ट करून ही मैफिल खूपच उंचावर नेली.
प्राजक्ता मांडके यांनी अतिशय रसाळ सूत्रसंचालन करत या मैफिलीत आणखीनच जान आणली. प्रत्येक गाण्याबद्दल जराही पाल्हाळ न लावता सुद्धा त्याची माहिती कमी आणि अचूक शब्दात सांगण्याचे तिचे कसब आणि शैली निव्वळ लाजवाब.
या मैफिलीसाठी हार्मोनियम वर प्रसन्न बाम, सिंथेसायजरवर अनय गाडगीळ, नितीन शिंदे तबला आणि ढोलकी, रिदम मशीन आणि ऑक्टोपॉडवर अभय इंगळे या सहकलाकारांनी त्यांना उत्तम साथ दिली.
पुन्हा या अशी आग्रहाची विनंती करत आयोजकांच्या वतीने सर्व कलाकारांचा यथायोग्य सन्मान करत या मैफिलीची सांगता झाली.
