Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधून सर्वसाधारण महिला गटासाठी सौ. सुप्रिया भरत वाल्हेकर यांना वाल्हेकरवाडी ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे. सोमवार, दिनांक 24 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी येथे झालेल्या भव्य ग्रामसभा-मिटींगमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

ग्रामसभेची सुरूवात ग्रामस्थांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भरत शंकर वाल्हेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. शिवस्मारक, स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य दवाखाना आणि नदीसुधार प्रकल्प या चार महत्त्वाच्या स्थानिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात गेल्या काही वर्षांत झालेल्या पाठपुराव्याची अधिकृत कागदपत्रे भरत वाल्हेकर यांनी ग्रामस्थांसमोर मांडली.

चर्चेचा ऊहापोह सुरू असताना प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरुण मंडळाचे अध्यक्ष नथुशेठ मारूती वाल्हेकर यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडत प्रभागाच्या एकूण मतदारसंख्येतील जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक साधारण तीस हजार मतदार वाल्हेकरवाडी परिसरातील असल्याने, सार्वत्रिक महिला गटातून सुप्रिया भरत वाल्हेकर यांना एकमुखी पाठींबा द्यावा, अशी सूचना सभागृहासमोर ठेवली. यास सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गडगडाटात संमती दिली.

बैठकीपूर्वीच विविध ग्रामस्थांकडून सुप्रिया वाल्हेकर यांच्या गेल्या चार-पाच वर्षांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला. नवरात्र उत्सव, स्वस्त थाळी योजना, रोजगार मेळावा, महिलांसाठी मोफत शिलाई मशीन व संगणक प्रशिक्षण अशा अनेक सामाजिक उपक्रमांमुळे त्या ग्रामस्थांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या असल्याचे मत स्थिरावले.

गावाच्या भविष्यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून सुप्रिया वाल्हेकर यांच्यावर ग्रामस्थांनी एकमताने विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली.

यावेळी सर्वसाधारण गटातून शुभम वाल्हेकर, तसेच अनुसूचित जाती महिला गटातून भाग्यश्री अक्षय चव्हाण आणि  पुष्पा शंकर झोंबाडे या नावांवरही ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली.

ग्रामसभेसाठी संपूर्ण वाल्हेकरवाडी परिसरातून शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषत: महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मिटींगचे आयोजन वाल्हेकरवाडी ग्रामस्थांनी अत्यंत नियोजित पद्धतीने यशस्वीरीत्या पार पाडले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version