Spread the love

 

 

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील असंघटित, बांधकाम, कंत्राटी, सफाई आणि घरेलू कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करणाऱ्या कष्टकरी संघर्ष महासंघाच्यावतीने आज एक शिष्टमंडळ संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची पुण्यात भेट घेतली. कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत विविध मागण्यांचे निवेदन सुप्रिया सुळे यांना देण्यात आले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेच्या केंद्रस्थानी घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा मुद्दा होता. याबाबत जानेवारी २०२४ मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सहा महिन्यांच्या आत समिती स्थापन करून कायदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून ठोस हालचाल झालेली नसल्याने देशातील कोट्यवधी घरेलू कामगारांवर अन्याय सुरूच आहे. या कामगारांना सन्मानाने जगता यावे यासाठी स्वतंत्र कायदा ही काळाची गरज असल्याचे मत शिष्टमंडळाने मांडले.

या चर्चेत किमान वेतन, समान वेतन, आरोग्य विमा, अपघाती मृत्यूच्या बाबतीत आर्थिक मदत, कंत्राटी कामगारांचे शोषण थांबवणे, बांधकाम कामगारांना थेट अनुदान मिळावे, अशा अनेक मुद्द्यांवरही चर्चा झाली. यावरही सुप्रिया सुळे यांनी सर्व बाबी मनपूर्वक ऐकून घेतल्या व आपुलकीने संवाद साधत आश्वासन दिले की, त्या संबंधित मंत्री, कायदामंत्री व कामगार मंत्रालयाशी पत्र व्यवहार करून यावर ठोस चर्चा करतील आणि संसदेमध्येही हे मुद्दे उपस्थित करतील.

या शिष्टमंडळात कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, तसेच माधुरी जलमूलवार, नंदा जाधव, राणी ठोकळ, विजया मोरे, सीता गायकवाड, अर्चना दिलापाक, माया शेटे हे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाच्या या भेटीमुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या संसद व प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात येण्यास हातभार लागेल, अशी आशा व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version