Spread the love

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा – माउली – तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्तिसागरच लोटला आहे.

प्रस्थान सोहळ्यास गुरुवारी (दि. १९) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य वाढविण्यात आला. त्यांनतर पुन्हा दर्शनबारीतून भाविकांना दर्शन देण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुरुवारची नित्य नियमाची माउलींची मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश तथा आळंदी देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र महाजन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार बाबाजी काळे, देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यावेळी उपस्थित होते.
सातच्या सुमारास मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. यावेळी पावसाचे आगमन झाले. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे रात्री ९ वाजता ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर वीणा मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. तद्नंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.
तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगांच्या निनादात ‘ज्ञानोबा – तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आनंदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृंदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेली महिला वारकरी आणि यामध्ये सहभागी झालेले तरुण वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात वारकरी भजनात अक्षरशः हरवून गेला. रात्री उशिरा हा वैभवी सोहळा भरावरस्तामार्गे, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वारचौकातून दर्शन मंडप इमारतीत पहिल्या मुक्कामासाठी विसावला.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version