Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य व स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारीची नियोजन बैठक दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीस महापालिका उपआयुक्त सचिन पवार अध्यक्षस्थानी होते.

बैठकीस महापालिकेचे माजी नगरसदस्य जयंत बागल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , सहाय्यक आरोग्याधिकारी किशोर दरवडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, सुधीर वाघमारे, तानाजी दाते, शांताराम माने, राजेश भाट, महेश आढाव, कुंडलिक दरवडे,अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड तसेच संस्कार प्रतिष्ठान, गुणवंत कामगार मंडळ, वारकरी मंडळ, मराठवाडा सेवा संस्था, पिंची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निसर्ग संवर्धन मंडळ, संत निरंकार मंडळ (पिंपरी व भोसरी), सायकल मित्र मंडळ आदी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत पुढील गोष्टींवर सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले:

स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोफत उपलब्धता तसेच त्यांची स्वच्छता तसेच परिसरात आवश्यकतेनुसार जंतू नाशक फवारणी

पिण्याच्या पाण्याची सोय

आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिरे

फराळ वाटप

स्वयंसेवकांच्या सहाय्याने रस्ते व परिसर स्वच्छता

पालखी मार्गावर विशेष स्वच्छता पथकांची नेमणूक

महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून पालखीच्या आगमनपूर्व आणि प्रस्थानानंतरही परिसर स्वच्छ ठेवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश शहरात शिस्तबद्ध, सुरक्षित व स्वच्छ वातावरणात पालखी सोहळा पार पाडणे हा आहे.

उप आयुक्त सचिन पवार यांनी या उपक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवी संस्थांचे आभार मानले असून, पालखी मार्गावर विशेष स्वच्छता पथक नेमण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.

महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेबरोबरच सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आवाहन आरोग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

“महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी स्वच्छता तसेच आरोग्यविषयक सर्व सुविधा पुरविण्यात येणार असून, हा उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आणखी व्यापक पद्धतीने आरोग्य विभागाकडून राबविण्यात येईल. नागरिकांनीही पुढाकार घेऊन महापालिकेस सहकार्य करावे.”

– सचिन पवार,
उप आयुक्त, आरोग्य विभाग,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version