Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विशेष ‘युवा प्रेरणा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहरात करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी 4 वाजता, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विक्रांत पाटील, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार,

“राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि घाटांचे पुनर्निर्माण केले. त्यांनी योग्य न्यायप्रणाली, औद्योगिक धोरण व महिला सशक्तीकरणाची अष्टपैलू उदाहरणे समाजासमोर ठेवली आहेत. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.”

कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धा सकाळी १२ ते दुपारी २ या वेळेत होणार असून त्याचे पारितोषिक वितरण देखील या कार्यक्रमात करण्यात येईल.

युवा वर्गाला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम असल्याने, युवकांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अनुप मोरे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version