Spread the love

हिंजवडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्स जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, हे चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण १२ कर्मचारी या टेम्पोत होते. हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स कर्मचारी घेऊन निघाली होती. त्यावेळी टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे काहींना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, तर काही जणांचा मृत्यू झाला. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, हिंजवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून, आगीमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून, सध्या संपूर्ण परिसर तपासण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हिंजवडीतील रूबी हॉल क्लिनिक आणि अन्य जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version