Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथे नुकताच मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यातील प्रशिक्षणार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाची अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चाळीस सदस्य सहभागी झाले होते.

इतिहास संशोधक मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. तसेच याठिकाणी उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधने, विविध राजसत्तांची पत्रे, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख आणि मोडीतील कागदपत्रांची माहिती आणि महत्त्व विषद केले.

भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना होऊन ११५ वर्षे झाली आहेत. केवळ मराठ्यांच्याच नव्हे तर भारतीय इतिहासातील अनेक दुर्मिळ अभ्यासाची साधने याठिकाणी अभ्यासकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. इंद्रायणी साहित्य परिषदेचे प्रवर्तक अरुण बोऱ्हाडे, अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर, सचिव रामभाऊ सासवडे यांनी या अभ्यासभेटीचे आयोजन केले होते. इतिहास संशोधक आणि मोडी लिपी प्रशिक्षक ब. हि. चिंचवडे, अभ्यासक अनिल दुधाने यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाच्या संग्रहातील पोथीशाळेतील काही दुर्मिळ संस्कृत ग्रंथ, ताम्रपट, चित्रे, नकाशे, पाषाणातील मूर्ती, वीरगळी, विविध राजसत्तेच्या काळातील जुनी नाणी, याशिवाय मुघल, आदिलशाही आणि निजामशाहीतील काही फर्माने, तसेच शहाजी राजे भोसले, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि छत्रपती शाहू महाराज यांची अस्सल पत्रे पाहण्यास मिळाली. पेशवेकालीन पत्रव्यवहारही याठिकाणी पाहण्यास मिळाला. हा सर्व ऐतिहासिक साधनांचा खजिना पाहून सर्व जण हरखून गेले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version