Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच निर्धारणासाठी तसेच योजनांच्या लाभांसाठी ग्राह्य न धरण्याची शासनाची भूमिका चुकीची असून शासनाच्या या धोरणामुळे प्राथमिक शाळा बंद पडून मोफत व
सक्तीच्या शिक्षणापासून हे विद्यार्थी दूर राहतील, असा दावा करत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी येत्या बुधवारपासून (दि. १८) तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सर्व शिक्षक प्रशासनाच्या व्हाॅट्सअप ग्रुपमधून बाहेर पडून असहकार आंदोलनही करणार आहेत.

विद्यार्थी शाळेत दाखल आहेत, मात्र काही विद्यार्थ्यांचे जन्म तारखेचे प्रमाणपत्र नसल्याने आधार कार्ड
निघत नाही; तसेच परराज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसंबंधी समस्या येतात. या आधार कार्ड
नसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, म्हणून सर्व शिक्षक काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाचा निषेध करणार आहेत.

“शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींना फाटा देत शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांचे प्रमाण

रद्द केले आहे. त्यामुळे यात विद्यार्थ्यांच्या हिताचा कोणताही विचार केलेला नाही. खेड्यापाड्यातील वाडी
वस्त्यांवरील मुलांना शिक्षणाची कवाडे कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातला आहे.”
-नारायण कांबळे, अध्यक्ष, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ

“शिक्षकांच्या पगारावर खूप खर्च होतो, अशी ओरड करून शिक्षकांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे.

शाळांमध्ये रोज नवनवीन उपक्रम, लिंक सप्ताह साजरे करण्याचे आदेश, बीएलओ निर्णय, सर्वेक्षण,
शालेय पोषण आहार, बांधकामे निर्णय समित्यांचे आर्थिक हिशोब ठेवणे अशा अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवून अध्यापन प्रक्रियेपासून दूर ठेवायचे षडयंत्र सुरू आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता ढासळल्याचे खापरही शिक्षकांवर फोडण्यात येते.”

-सुरेखा सोनवणे, शिक्षक नेत्या, मावळ तालुका

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version