पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहारात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरात आता एकच खळबळ उडाली आहे. अशातच येत्या २० तारखेला अजित गव्हाणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला गळती सुरूच असल्याचं बोललं जात आहे.
अजित गव्हाणे यांच्यासह राहुल भोसले, पंकज भालेकर आणि यश साने यांनी देखील अजित पवार गटाला रामरामा ठोकला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. अशातच अलिकडेच माजी आमदार विलास लांडे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. ते देखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे विलास लांडेंनी देखील शरद पवार गटात प्रवेश केल्यास अजित पवारांचं शहरातील वचर्स्व कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अजित गव्हाणे यांनी आपल्या १६ नगरसेवकासह अलिकडेच शरद पवारांची भेट घेतली होती. त्याचवेळी अजित गव्हाणे अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती. यानंतर आज अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यातच येत्या २० तारखेला शरद पवार गटाचा भव्य मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात अजित गव्हाणे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह अजित पवार गटातील काही नगरसेवक देखील शरद पवार गटात दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
