Spread the love

 

पिंपरी,  ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विभाग, ग्रंथालय विभाग आणि रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.विक्रांत शेळके आणि मा. विशाल खोंदले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.माधव सरोदे तर रयत विद्यार्थी मंचचे अध्यक्ष मा.धम्मराज साळवे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.विक्रांत शेळके यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून कवितेची निर्मिती, कवितेची आस्वाद प्रक्रिया, कवितेचे विविध पैलू अशा विविध बाबींवर मार्गदर्शन करत ‘ कविता म्हणजे मानवी मनाचा पहिला हुंकार असतो.’ असे प्रतिपादन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी कविता कशी घडते ते आपल्या स्वलिखित कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविले.

मा.विशाल खोंदले यांनी विनोदी कवितेचे विश्व आपल्या स्वलिखित कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समोर उलगडून दाखवत  सध्याच्या धावपळीच्या जगात विनोदी कवितेमुळे मानवी आयुष्य स्वछंदी कसे जगता येते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

धम्मराज साळवे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा सध्याच्या काळात टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी सर्व मराठी भाषकांनी मराठी भाषेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे केला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.

उपप्राचार्य डॉ.मृणालिनी शेखर यांनी आपली उत्स्फूर्त कविता सादर करीत कवी कुसुमाग्रजांच्या मराठी साहित्यसेवेचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला. तर प्राचार्य प्रो.डॉ.माधव सरोदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे इतर भाषांपेक्षा असलेले वेगळेपण सांगत सध्याच्या काळात मराठी भाषेच्या विकासासाठी आपण विशेष  प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग पुणेचे माजी पर्यवेक्षीय अधिकारी आर.जी.जाधव , प्रा.अनिकेत खत्री, महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संतोष शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.संग्राम गोसावी यांनी केले.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version