Spread the love

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत शहरातील संगणक प्रणालीची सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, मत्स्यव्यवसाय, रस्ते विकास, वैद्यकीय सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक उपक्रमांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

पुनावळे परिसरातील रस्ते व जलनिस्सारणाच्या कामासाठी सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा झाली. पुनावळे बी.आर.टी.एस. रोडपासून पुनावळे अंडरपासपर्यंत १८ मीटर रुंद रस्ता विकसित करणे, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी जलनिस्सारण वाहिन्या उभारणे आणि संबंधित पायाभूत सुविधांची कामे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

चिंचवड मतदारसंघातील विशालनगर, पिंपळे निलख येथील गणपती चौक ते छत्रपती बँक ते साईश्री कॉलनी या १२ मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामालाही मंजुरी देण्यात आली.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या सर्जरी विभागासाठी निगेटिव्ह प्रेशर ऊंड थेरपी मशीनसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘एज्युराईज (न्यूजपेपर इन एज्युकेशन)’ उपक्रमांतर्गत साप्ताहिक अंक उपलब्ध करून दिला जाणार आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी १६ माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांना साप्ताहिक अंक उपलब्ध करून देण्याच्या प्रस्ताव मंजुरी मिळाली.

याशिवाय पदव्युत्तर पदवी संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विविध वैद्यकीय साहित्याची खरेदी, तसेच प्रभाग क्रमांक २ चिखली परिसरातील महापालिका इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या संगणक यंत्रणेसाठी ३ हजार संगणकांना अँटी व्हायरस खरेदी करण्यास तसेच तीन वर्षांच्या कालावधीकरिता एक सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली.

स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आलेल्या ह्या प्रस्तावांमुळे महापालिकेच्या डिजिटल प्रणालीची सुरक्षितता, कर्मचारी सेवाविषयक बाबी, पुनावळे परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते विकास, वैद्यकीय सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.

स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आलेले हे प्रस्ताव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते व जलनिस्सारणाची कामे, महापालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेचे बळकटीकरण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यावर या निर्णयांमधून भर देण्यात आला आहे. नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जाईल.
– अभिषेक बारणे,
सभापती स्थायी समिती

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version