
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, भाजप ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी शीतल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये शीतल शिंदे यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शीतल शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला असून, समाजाच्या प्रगतीसाठी आयोजित विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. ओबीसी समाजाच्या हक्क, समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी यापूर्वीही काम केले आहे.
नवीन जबाबदारीबाबत शीतल शिंदे यांनी आगामी काळात ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजातील विविध घटकांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शीतल शिंदे यांच्या नियुक्तीचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजातील विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या नियुक्तीमुळे पक्षसंघटनेत तसेच ओबीसी मोर्चाच्या कामाला आणखी बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

