Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा बुधवार (ता. २१) पासून सुरू होत आहे. सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आहे. यंदा पिंपरी चिंचवड शहरातून २१ हजार ५०० परीक्षार्थी आहेत. यासाठी ३३ केंद्रांवर बोर्डाकडून तयारी पूर्ण झाली असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत आहे. परीक्षार्थींनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी दोन कस्टडी केंद्र दिले आहेत. श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय कस्टडीअंतर्गत १३ उपकेंद्र तर डॉ. डी. वाय. पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय कस्टडीमध्ये २० उपकेंद्र आहे. दरम्यान, उद्यापासून मुख्य परीक्षेला सुरवात होत असल्याने सर्व परीक्षा केंद्र सज्ज झाले आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवशी दुपारनंतर परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक लिहिण्याचे काम सुरू होते. प्रत्येक वर्गखोल्यांवर क्रमांक टाकले. परीक्षेसंबंधी माहितीपर फलकलेखन केले.

बैठक व्यवस्थेबाबत आवाहन
बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था बोर्डाकडून दोन दिवसापूर्वी जाहीर केली आहे. संबंधित महाविद्यालयात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहेच. शिवाय, प्रत्येक विषयानुसार केंद्र कार्यरत आहेत. यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत. परीक्षा केंद्राजवळील १०० मीटरवर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रचालकांनी केले आहे.

कॉपीमुक्‍त अभियान
कॉपीमुक्‍त अभियानासाठी परीक्षा मंडळाने पिंपरी विभागासाठी एकूण तीन भरारी पथके नेमली आहेत. परीक्षा केंद्रांवर शांततेत प्रवेश करण्याच्या सूचना भरारी पथकांना देण्यात आल्या असून, कॉपीमुक्‍त अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version