
पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशाची प्रकृती बिघडली; ‘गोल्डन आवर’मध्ये उपचार मिळाल्याने रुग्ण सुरक्षित
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चालत्या बसमध्ये अचानक उच्च रक्तदाब वाढल्याने एका ५५ वर्षीय प्रवाशासाठी बस चालक आणि वाहक ‘देवदूत’ ठरले आहेत. PMPML बसमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:५० वाजेच्या सुमारास चाकण येथील रहिवासी (वय ५५ पुरुष) हे पिंपरी ते चाकण असा बसने प्रवास करत होते. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या गेटसमोर बस आली असता, प्रवाशाला अचानक अस्वस्थ वाटू लागले, घामाघुम अवस्थेत छातीत वेदना होऊन प्रवाशाची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच बस चालक आणि वाहकाने जराही वेळ न दवडता कमालीचे प्रसंगावधान दाखवले. त्यांनी बस थेट डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या परिसरात नेली. वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘गोल्डन आवर’मध्ये रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
तातडीने उपचार सुरू
रुग्णालयात पोहोचताच कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन विभागातील (Emergency) डॉक्टरांच्या टीमला तात्काळ कल्पना दिली. रुग्णालयाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला यांना कॅज्युअल्टी विभागात दाखल करून घेत प्राथमिक व अत्यावश्यक उपचार सुरू केले.रुग्णाची प्रकृती स्थिर आहे यांच्यावर सध्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता व्यवस्थित आणि स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. चालक आणि वाहकाने दाखवलेल्या या समयसूचकतेचे व संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
