
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रामदास वाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तिरंग्याच्या साक्षीने, राष्ट्रगीताच्या स्वरांनी आणि देशभक्तीच्या उत्साहाने मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या पिंपरी शाखेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका अध्यक्ष रामदास वाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण होताच उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला अभिवादन केले.
या प्रसंगी मराठी पत्रकार संघ
कामशेत शहर अध्यक्ष चेतन वाघमारे, निलेश ठाकर, प्रफुल्ल ओव्हाळ आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाघमारे उपस्थित होते.
मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापक गणेश वेदपाठक, सहव्यवस्थापक अनिश अ., जय मिसाळ तसेच संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे उत्साहाने आयोजन केले. कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांनी तिरंग्याला सलामी देत स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला.
“स्वातंत्र्य हा केवळ आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस नसून, आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ सार्थकी लागेल. राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रहिताची भावना प्रत्येकाच्या मनात सदैव जागी राहिली पाहिजे,” असे रामदास वाडेकर यांनी सांगितले.
गणेश वेदपाठक म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. देशाच्या प्रगतीत आपापल्या परीने योगदान देत एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प या दिवशी करूया.”
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. तिरंग्याच्या छायेखाली एकत्र आलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर देशप्रेमाचा अभिमान आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. मलबार गोल्डच्या पिंपरी शाखेत झालेल्या या सोहळ्याने स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला एक वेगळाच देशभक्तीपूर्ण रंग दिला.

