Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महिलांची सुरक्षा व सन्मान यासाठी उपस्थितांना ‘पॉश’ कायद्याबाबत जागृतीची महत्त्वपूर्ण शपथ देण्यात आली.

या सोहळ्याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी (भा.प्र.से.), डॉ. अनुश्री चौधरी आणि ‘पीएमआरडीए’ दक्षता विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल झेंडे (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली. दक्षता विभागाचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन पाटील, त्यांचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला शिस्तबद्ध मानवंदना दिली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘पीएमआरडीए’च्या महिला कर्मचाऱ्यांनी काढलेली आकर्षक रांगोळी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी केवळ ध्वजारोहण न करता सामाजिक भान जपत महिला सुरक्षा व सन्मान, तसेच ‘पॉश’ कायद्याबाबत जागृतीची शपथ देण्यात आली, हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

या कार्यक्रमाला ‘पीएमआरडीए’तील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये प्रशासन विभागाच्या सहआयुक्त रूपाली आवले-डंबे, जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे, सह-महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, कार्यकारी अभियंता अभिमान भोसले, शिवकुमार कुपल, जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेश माशेरे, तहसीलदार आशा होळकर, तहसीलदार अभिजीत जगताप, भूमी अभिलेख विभागाच्या अधीक्षिका आशा जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे आणि अग्निशमन अधिकारी विजय महाजन आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version