Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच सोसायट्यांच्या परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख  चेतन महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पवार यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधले आहे. शहरातील विविध प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच सोसायट्यांच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे अधिक धोकादायक ठरत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम राबवावी आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच रखडलेल्या रस्त्यांची कामेही तातडीने सुरू करून निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू करून निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करत येत्या १० दिवसांत प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चेतन पवार यांनी दिला आहे.

नागरिकांच्या जीविताशी संबंधित या अत्यंत गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन या इशाऱ्यानंतर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर कितपत तत्परतेने कारवाई करते, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version