Spread the love

सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये सिद्धी जोहरींचे प्रेरणादायी भाषण; विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि यशाचा संदेश

“सिद्धी जोहरी यांचे कर्तृत्व म्हणजे आजच्या युथ आणि महिलांसाठी ‘रिअल-लाइफ इन्स्पिरेशन’! त्यांच्यासारख्या अष्टपैलू मार्गदर्शकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स, सोशल अवेअरनेस आणि लीडरशिपची नवी ऊर्जा निर्माण होत आहे!”

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आत्मविश्वास, सकारात्मक विचार, नेतृत्वगुण, सामाजिक भान आणि मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी देण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनमध्ये विविध प्रेरणादायी व व्यक्तिमत्त्व विकासपर उपक्रम सातत्याने राबविले जातात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदृष्टीतून आणि उपाध्यक्षा व सचिव सुषमा एस. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि जीवनमूल्यांची जोड दिली जाते.

याच उद्देशाच्या अनुषंगाने सूर्यदत्तच्या बावधन परिसरातील बन्सीरत्न सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमात ‘मिसेस इंडिया इंटरनॅशनल’, ‘फेस ऑफ इंडिया’, वैद्यकीय जैवरसायनशास्त्रज्ञ, महिला सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय राजदूत, ‘नारी’च्या सहसंस्थापक तसेच ‘नेचर वेल्फेअर कौन्सिल ऑफ इंडिया’च्या केंद्रीय संचालिका सौ. सिद्धी जोहरी यांनी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांशी मनमोकळा व प्रेरणादायी संवाद साधला.

“स्मार्ट दिसण्याबरोबरच स्मार्ट विचार करा!” असा संदेश देत सिद्धी जोहरी यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. आपल्या जीवनातील संघर्ष, अनुभव आणि यशस्वी वाटचालीतील विविध टप्पे सांगताना त्यांनी शिक्षण आणि ज्ञानासोबत आत्मविश्वास, सकारात्मक विचार, संवेदनशीलता आणि सामाजिक भान विकसित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रभावी संवादकौशल्य, जबाबदार नागरिकत्व आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही व्यक्तिमत्त्व विकासाची महत्त्वाची अंगे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही; सकारात्मक दृष्टिकोन, चांगले व्यक्तिमत्त्व आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तितकीच महत्त्वाची आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून ध्येय निश्चित करावे, अडचणींमधून शिकत पुढे जावे आणि स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. अश्विनी देशपांडे यांनी सौ. सिद्धी जोहरी यांचा परिचय करून देत त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि महिला सक्षमीकरणातील योगदानाचा गौरव केला. त्यानंतर प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा एस. चोरडिया यांच्या हस्ते सिद्धी जोहरी यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सूर्यदत्त समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सिद्धी जोहरी यांच्यासारख्या यशस्वी, कर्तृत्ववान आणि नेतृत्वगुणांनी समृद्ध महिला आजच्या युवा पिढीसाठी, विशेषतः तरुण विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील यशाबरोबरच महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सूर्यदत्तच्या व्यासपीठावर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत असून, त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, मूल्याधिष्ठित जीवन आणि यशाची नवी दिशा मिळेल.”
विद्यार्थ्यांच्या यशाच्या प्रवासात पालक, शिक्षक आणि कुटुंबाच्या पाठबळाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःची ध्येये निश्चित करून ती साध्य करण्यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

भाषणानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. सिद्धी जोहरी यांनी प्रत्येक प्रश्नाला समर्पक, व्यावहारिक आणि प्रेरणादायी उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील विविध पैलूंकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.

सूर्यदत्त समूहात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही सातत्याने भर दिला जातो. गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षणाबरोबर संवादकौशल्य, नेतृत्वगुण, उद्योगाभिमुख कौशल्ये, सामाजिक भान आणि जीवनकौशल्ये विकसित करणारे विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणातून सक्षम आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व घडविणे, तसेच विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांसाठी तयार करणे, हा या उपक्रमांचा केंद्रबिंदू असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version