Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान तत्कालीन जनरल सेक्रेटरी संतोष दळवी यांच्या आवाजाचा कथित गैरवापर करून बनावट ऑडिओ क्लिप तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणात तब्बल अडीच वर्षांनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावटगिरी) या गंभीर कलमासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून, फॉरेन्सिक तपासणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.

जानेवारी २०२४ मध्ये युनियनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष दळवी यांच्या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषण कथितरीत्या कट-पेस्ट करून बनावट ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली होती. ही क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच कामगार व मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित कारवाई न झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आवश्यक डिजिटल पुरावे सादर करण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याने तपास सुरू केला.

प्राथमिक तपासात संबंधित ऑडिओ क्लिप एडिट करून तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ४६८, ४७१ आणि ५०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी कलम ४६८ हे फसवणुकीच्या उद्देशाने बनावटगिरी केल्याप्रकरणी लागू होणारे गंभीर कलम असून त्यात कमाल सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ‘ई-साक्ष’ प्रणालीद्वारे संतोष दळवी यांचे व्हॉईस सॅम्पल स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत नोंदवून घेतले आहेत. तसेच संबंधित मोबाईल क्रमांकधारक संशयिताला चौकशीसाठी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

याशिवाय, निवडणुकीच्या काळात प्रसारित झालेली कथित एडिटेड ऑडिओ क्लिप पंचनाम्याद्वारे जप्त करून ती पुराव्यादाखल पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप आणि व्हॉईस सॅम्पल राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (RFSL) तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, स्पेक्ट्रोग्राम विश्लेषणाद्वारे ऑडिओमध्ये छेडछाड झाली आहे का, याबाबत वैज्ञानिक निष्कर्ष मिळणार आहेत.

या प्रकरणातील तपास कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) द्वारेही केला जाणार आहे का, तसेच त्यासाठी पोलिसांनी संबंधित दूरसंचार कंपन्यांना पत्रव्यवहार केला आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आवश्यक माहिती जाणून घेणार असल्याचे समजते.

तसेच, तपासादरम्यान कोणत्याही व्यक्तीने डिजिटल अथवा अन्य प्रकारचा पुरावा नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील लागू असलेल्या कठोर कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आम्ही अधिक माहितीसाठी संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधला असता, “वेळ आल्यानंतर बोलेन,” एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित संशयित अथवा इतर संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, फॉरेन्सिक अहवाल, डिजिटल पुरावे आणि इतर तपासाच्या आधारे पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version