Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या ऐतिहासिक विकास प्रवासावर आधारित पुस्तकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शहरात येण्याची विनंती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी शहा यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून त्याने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. क्रांतिवीर चापेकर बंधूंची जन्मभूमी म्हणून ऐतिहासिक गौरव प्राप्त केलेल्या या शहराने औद्योगिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. स्मार्ट सिटी मिशन, मेट्रो प्रकल्प तसेच आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या शहराची राष्ट्रीय ओळख अधिक बळकट झाली आहे.

या गौरवशाली आणि प्रेरणादायी विकास प्रवासाचे भावी पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि अनुदानातून पिंपरी-चिंचवडच्या सुमारे ७५ वर्षांच्या इतिहास, विकास, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक व जनजीवनाशी संबंधित विविध पैलूंवर आधारित एक विशेष पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पुस्तक शहराच्या ऐतिहासिक वारशाचे, विकास प्रवासाचे आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीचे समग्र दस्तऐवज आहे. या पुस्तकाची एक प्रत आपल्या अवलोकनासाठी सादर करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा गड असून या शहराला वेळोवेळी आपले स्नेह, मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभत आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची मनापासून इच्छा आहे की या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे लोकार्पण आपल्या शुभहस्ते संपन्न व्हावे.

महापौरांची भेटण्याची इच्छा

याच उद्देशाने पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे हेही आपणास प्रत्यक्ष भेटून पुस्तकाच्या लोकार्पण समारंभाची रूपरेषा आणि कार्यक्रमाबाबत चर्चा करू इच्छितात. त्यामुळे आपल्या सोयीप्रमाणे त्यांना भेटीसाठी वेळ द्यावी. त्यामुळे कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा आपल्या समोर सादर करता येईल, असेही खासदार बारणे यांनी शहा यांना म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version