
पीसीएमसी शिक्षण विभागातील शालेय साहित्य खरेदीवर प्रश्नचिन्ह; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
डीबीटीऐवजी ई-रुपी प्रणालीद्वारे निविदा प्रक्रिया राबविल्याचा आरोप; नगरसेवक शीतल शिंदे यांचे निवेदन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी प्रक्रियेत शासनाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) योजनेऐवजी ई-रुपी (e-RUPI) प्रणालीद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप करत नगरसेवक शीतल विजय गोरख शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
२८ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने डीबीटी योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट धोरण निश्चित केले असतानाही त्याला बगल देत ई-रुपी प्रणालीद्वारे शालेय साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाचे उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
निवेदनात शिक्षण समितीतील सदस्यांना चुकीचे मार्गदर्शन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांना मिळणाऱ्या अनुदानाच्या लाभावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि आक्षेप निवेदनासोबत जोडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि शासनाच्या डीबीटी धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी शीतल शिंदे यांनी मुख्यमंत्रींकडे केली आहे.
दरम्यान, या निवेदनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील शालेय साहित्य खरेदी प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याप्रकरणी प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

