
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौक या स्पाईन रोडवरील वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, सार्वजनिक फुटपाथवरील अतिक्रमणे, झाडतोड आणि इतर नागरी समस्यांबाबत उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याची तातडीने दखल घेण्यात आली. या अनुषंगाने अवघ्या २४ तासांच्या आत महापालिका व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत संयुक्त पाहणी केली.
मारुती जाधव यांच्या पाठपुराव्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वाहतूक विभाग, बीआरटी विभाग, स्थापत्य विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पाईन रोडची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटविणे, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करणे आणि सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याबाबत चर्चा झाली. संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या पाहणीवेळी वाहतूक विभागाचे निरीक्षक घाडगे, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव, फ क्षेत्रीय कार्यालयाचे अतुल पाटील तसेच स्थापत्य, आरोग्य, अतिक्रमण, बीआरटी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मारुती जाधव यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नसून, प्रभाग क्रमांक ११ वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असे सांगितले. त्यांनी “आश्वासन नाही, प्रत्यक्ष कृती” हेच आपल्या कामाचे धोरण असल्याचेही नमूद केले.
