
परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांच्या सेवेत टँकर सोबत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी वृक्षमित्र अरुण पवार यांनी मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर पालखी सोहळ्यासोबत ठेवले आहेत. पंढरपूर ते आळंदी या संपूर्ण पालखी मार्गावर त्यांच्यावतीने मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात ऊन-पावसाची तमा न बाळगता लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरकडे जातात. या काळात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होते. हीच गरज ओळखून अरुण पवार हे गेल्या बारा वर्षांपासून पालखी सोहळ्यासोबत मोफत पिण्याच्या शुद्ध पाण्याचे टँकर पाठवत आले आहेत. यंदाही पालखी सोहळ्यात अरुण पवार यांनी पाण्याचे सात टँकर पाठवले आहेत. विशेष म्हणजे पालखीच्या परतीच्या प्रवासातही हे पाण्याचे टँकर पालखी सोहळ्यासोबतच आहेत. त्यामुळे परतीच्या वाटेवरही वारकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. अरुण पवार यांच्या या उपक्रमाचे वारकरी संप्रदायातून आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना अरुण पवार म्हणाले, की वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा आहे. माऊली व तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी कोणत्याही वारकऱ्याचे हाल होऊ नयेत, हाच यामागचा उद्देश आहे.
