Spread the love

तीन दिवसीय महोत्सवात ५०० हून अधिक महिलांचा सहभाग; सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि सन्मान सोहळ्याने रंगला उत्सव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि पिंपरी-चिंचवड सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, आमदार उमा गिरीश खापरे यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेला ‘नारीशक्ती महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. महोत्सवाचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, माजी महापौर मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, सोशल क्लबचे सर्वेसर्वा प्रवीण तुपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार उमा खापरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयदीप खापरे यांनी मानले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भजनी मंडळांच्या महिलांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ३५ संघांनी सहभाग घेतला असून तब्बल ४९६ महिलांनी सहभाग नोंदविला.
दुसऱ्या दिवशी मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले. सुमारे १७५ महिलांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गणेश वंदना, पोवाडा, नृत्य यांसारख्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.
तिसऱ्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. भाजी विक्रेती, गृहिणी, शिक्षिका, मुख्याध्यापिका, वास्तुविशारद, नेत्रतज्ज्ञ, परिचारिका, पायलट, सफाई कर्मचारी, धनुर्धारी अशा विविध क्षेत्रांतील महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजातील सर्व स्तरांतील महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात आल्याचे आमदार उमा खापरे यांनी सांगितले.
समारोप कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक करत राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच पिंपरी-चिंचवडमधील महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

आमदार उमा खापरे यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक कर्तृत्ववान महिलेला योग्य व्यासपीठ मिळावे, तिच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने नारीशक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील महिलांनी या उपक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्व सहभागी, आयोजक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप सुरेल गीतांच्या कार्यक्रमाने झाला. केतकी माटेगावकर आणि संदीप उबाळे यांच्या सादरीकरणाने उपस्थितांनी मंत्रमुग्ध होत महोत्सवाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version