
“विद्यार्थ्यांचे भविष्य विकणाऱ्यांना कोणतीही माफी नाही!” – डॉ. धम्मरत्न गायकवाड, युवक शहराध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठाच्या नावाने कथित बनावट गुणपत्रिका, निकाल आणि पदवी प्रमाणपत्रे तयार करून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कुलगुरूंसह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी केली आहे.
डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कोणतीही नियमित परीक्षा किंवा प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करता प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या गुणपत्रिका, निकाल तसेच पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे कथित रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचारी रमेश मुखेकर यांनी काम करून देण्यासाठी ₹३ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी ₹७० हजार Google Pay द्वारे स्वीकारल्याचा दावा करण्यात आला असून, उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर घेण्याचे ठरले होते, असेही निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भातील मोबाईल चॅट, आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि कथित बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, इतके गंभीर आरोप आणि पुरावे सादर होऊनही संबंधित कर्मचारी किंवा इतर जबाबदार व्यक्तींवर अद्याप कोणतीही ठोस विभागीय कारवाई झालेली नसल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची चौकशी केवळ विद्यापीठापुरती मर्यादित न ठेवता स्वतंत्र उच्चस्तरीय समिती किंवा सक्षम तपास यंत्रणेमार्फत करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुलगुरूंसह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि आरोपींना पदावरून दूर करण्यात यावे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ने केली आहे.
या प्रकरणात तातडीने निष्पक्ष चौकशी सुरू करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर राज्यभर विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून भ्रष्टाचाराविरोधात तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी दिला.

