
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक असलेली एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) ड्रेनेज लाईन तातडीने जोडावी, अशी आक्रमक मागणी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पुनर्वसन प्रकल्प रखडत असून त्याचा फटका हजारो सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
महासभेत बोलताना गायकवाड म्हणाले की, एसआरए योजनेंतर्गत अनेक कुटुंबे स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक प्रकल्प मंजुरीनंतरही पूर्णत्वास जाऊ शकत नाहीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असून ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
ते पुढे म्हणाले की, एसटीपी ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण केल्यास अनेक एसआरए प्रकल्पांना गती मिळेल आणि हजारो कुटुंबांचे पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे हा विषय केवळ तांत्रिक नसून सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घराशी संबंधित आहे.
गायकवाड यांनी प्रशासनाला सुनावत, नागरिकांच्या मूलभूत हक्कांबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. आवश्यक निधी, मंजुरी आणि तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून एसटीपी ड्रेनेज लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चेनंतर महापालिका प्रशासनाने विषयाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आता प्रशासन कृती करते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच पुनरावृत्ती होते, याकडे एसआरए लाभार्थी आणि शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

