
करदात्यांच्या पैशातून उभारलेली सुविधा नागरिकांपासून दूर; निष्क्रिय प्रशासनाविरोधात महासभेत संताप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या टाऊनहॉल संकुलातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या व्यायामशाळेचा मुद्दा नगरसेवक विकास साने यांनी महासभेत आक्रमकपणे उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारण्यात आलेली व्यायामशाळा आजही बंद असल्याने नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
महासभेत बोलताना साने म्हणाले की, टाऊनहॉल परिसरातील व्यायामशाळेसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र योग्य नियोजन, देखभाल आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे ही सुविधा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे परिसरातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी इतरत्र जावे लागत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक मालमत्ता धूळ खात पडली असून, त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी साने यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, टाऊनहॉलमधील व्यायामशाळा तात्काळ सुरू करून नागरिकांसाठी खुली करावी, अन्यथा या प्रश्नावर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.
महासभेत या विषयावर चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने व्यायामशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली. मात्र आता नागरिकांचे लक्ष प्रशासन प्रत्यक्षात किती लवकर ही सुविधा सुरू करते, याकडे लागले आहे.

