Spread the love

पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जनसेवा सप्ताहा’ अंतर्गत पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पिंपळे गुरव येथील ममता अंध-अनाथ आश्रमात फळे व धान्य वाटप, पाच हजार वृक्षरोपे वाटप आणि १३२ रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रक्तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण पवार, शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शंतनू डोळस, अनुसूचित जमाती विभागाचे शहराध्यक्ष विष्णू शेळके, तृप्तीताई जवळकर, चैताली शालिंदर, गौरीताई गोंनटे यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमांचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, कैलास थोपटे, सागर कोकणे, कॅप्टन युवराज माने, अतिश जवळकर, किशोर अट्टरगेकर, दीपक जाधव, दत्ता कदम, लहुजी पवार, नरेश पवार, साहिल रोकडे, बळीराम माळी, नितीन चौधरी, अनिकेत मुपीड, गणेश जवळकर, अनिता पांचाळ, आकाश कळसकर, दत्तात्रय धोंडगे, संतोष शिंदे, बाळासाहेब साळुंके, शिवाजी घोडके, सुग्रीव पाटील, लक्ष्मण जाधव, विजयराज नागरी पतसंस्थेचे संचालक सूर्यकांत कुरूलकर, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य क्लब (राजमाता गार्डन ग्रुप) व हास्ययोग परिवार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सप्ताहाच्या सुरवातीला पिंपळे गुरव येथील ‘ममता अंध अनाथ आश्रम’ येथे आश्रमातील विद्यार्थ्यांना व गरजूंना अन्नधान्य आणि फळांच्या किटचे वाटप करण्यात आले.

तसेच अरूण पवार यांच्या कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पिंपरी-चिंचवड हरित बनवण्याच्या दृष्टीने वाटप करण्यात आलेली रोपे घेण्यासाठी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, की अजितदादांचा जीवनप्रवास हा जनसेवेने व्यापलेला होता. अंध अनाथ आश्रमातील मुलांना मदत आणि हजारो झाडांचे वाटप करून कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही केवळ राजकारण नाही, तर समाजकारणावर विश्वास ठेवणारी संघटना आहे.

नाना काटे म्हणाले, की अजितदादा पवार यांनी नेहमीच शब्दापेक्षा कामाला प्राधान्य दिले. पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात दादांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची जयंती साजरी करताना अंतःकरण जड होत आहे. त्यांची पोकळी भरून न काढण्यासारखी आहे.
अरुण पवार म्हणाले, की अजितदादा म्हणजे पन्नास वर्षे राजकारणात असूनही सर्वसामान्यांच्या शब्दांना किंमत देणारा नेता होता. खेड्यामध्ये शिकूनही त्यांनी अंगीकारलेल्या सवयी आदर्श घेण्याजोग्या आहेत. त्यांनी एकीकडे आयटी हब वसवले, तर दुसरीकडे शेतीचाही तितकाच विचार केला. नैसर्गिक संकटाच्या वेळी पहिली आठवण दादांची येते. दादांचे विचार आत्मसात करणे, हीच दादांना खरी आदरांजली ठरेल.

तानाजी जवळकर यांनी सांगितले, की अजितदादा यांची जयंती साजरी करण्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला येईल असे वाटले नव्हते. ते उत्तम प्रशासक होते. महाराष्ट्रातील प्रश्नांची जान अजित पवार यांच्याशिवाय अन्य कुणाला नाही. प्रत्येकाच्या कामाला महत्त्व देणारा नेता होता.
राजू लोखंडे म्हणाले, की दादांची काम करण्याची पद्धत व संकटावेळी ठामपणे पाठीशी उभे राहण्याची कार्यशैली वेगळी होती. त्यांचे विचार, कार्यशैली आत्मसात केली पाहिजे.
विष्णू शेळके म्हणाले, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांच्या विचारावर चालत आहोत. त्यांची शिस्त, स्वच्छता या सवयी आम्ही अंगीकारल्या आहेत. त्यांच्या जाण्याने नवीन पिढीचे खूप नुकसान झाले आहे.
शंतनू डोळस म्हणाले, की धडाडीचा नेता आपण हरवला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला आठवणीत ठेवणारा नेता पुन्हा होणे नाही. अजितदादा हे महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version