
पिंपरी-चिंचवड शहरातून अभिनंदनाचा वर्षाव
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजप युवा मोर्चा, उद्योग आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आदित्य नारायण कुलकर्णी यांच्यावर पक्षाने आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्याची आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांच्याकडे ‘पदवीधर निवडणूक संयोजक (पिंपरी-चिंचवड शहर)’ या पदाचा अतिरिक्त कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) निष्ठावान कार्यकर्ते म्हणून यमुनानगर, निगडी आणि संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात आदित्य कुलकर्णी यांनी प्रदीर्घ काळ सामाजिक आणि संघटनात्मक कार्य केले आहे. संघाच्या शाखा स्तरापासून मिळालेल्या संस्कारांच्या बळावर त्यांनी युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या शहराध्यक्षपदीही उल्लेखनीय काम केले आहे.
आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पदवीधरांशी थेट संवाद साधणे, त्यांचे प्रश्न व समस्या प्रशासनासमोर मांडणे, पदवीधरांची नोंदणी वाढवणे आणि निवडणुकीचे योग्य नियोजन करणे यावर त्यांचा प्रामुख्याने भर असणार आहे.
“पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली ही नवीन जबाबदारी मी पूर्ण निष्ठा व ताकदीने पार पाडेन. शहरातील जास्तीत जास्त पदवीधरांना पक्षाच्या विचारधारेशी आणि विकासाच्या प्रवाहाशी जोडणे हे माझे प्राथमिक ध्येय असेल.”
— आदित्य नारायण कुलकर्णी (शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडी व संयोजक, पदवीधर निवडणूक : भाजप युवा मोर्चा )
या नियुक्तीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मित्र परिवार, भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून आदित्य कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा आणि पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
