Spread the love

“नागरिकांच्या सोयीसाठी असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवणार” – संतोष सौंदणकर

रमामंगल सोशल फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रमामंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आधार नोंदणी व दुरुस्ती शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना जिल्हा संघटक तथा रमामंगल सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

शनिवार (दि. २५) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चिंचवड येथील गुरुकृपा हाउसिंग सोसायटी, रस्टन कॉलनी येथील संतोषभाऊ सौंदणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर पार पडले. दिवसभर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सेवांचा लाभ घेतला. यावेळी कैलास भंडारी, विजयकुमार पाटील, आनंद ढगे, बाप्पू वाघमारे, गुलाब मुलाणी, फिरोज खान, संतोष मोरजकर, गणेश गाडे, ओमप्रसाद परदेशी, आश्विन मायणले, कार्तिक सुतार, स्वप्नील गाडे उपस्थित होते.

शिबिरामध्ये नवीन आधार नोंदणी, बायोमेट्रिक अपडेट, नाव व पत्ता दुरुस्ती, विवाहानंतर नाव बदल, जन्मतारीख दुरुस्ती तसेच हरवलेल्या आधार कार्डाची पुनर्प्राप्ती अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींसाठी होम एनरोलमेंट सेवाही उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी संतोष सौंदणकर यांनी सांगितले की, आधार कार्डाशी संबंधित कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. भविष्यातही रमामंगल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अशा विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि प्रशासकीय उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रमामंगल सोशल फाउंडेशनचे सचिव सुमित कांबळे, उपाध्यक्ष गणेश ओगले, सदस्य सुभाष मालुसरे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version