Spread the love

कठीण परिस्थितीवर मात करत UPSC मध्ये १२५ वा क्रमांक पटकावणाऱ्या कबीर कांबळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव! आमदार अमित गोरखे यूथ फाउंडेशन चा सोहळा उत्साहात संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि कै. गणपत गोरखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अमित गोरखे यूथ फाउंडेशन’ च्या वतीने आयोजित ‘गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा २०२६’ अत्यंत दिमाखात पार पडला.

बुधवार, दिनांक २२ जून रोजी नोवेल स्कूल येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला पाठबळ देणाऱ्या या उपक्रमाचे हे सलग सातवे वर्ष होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला मदत म्हणून यावेळी ‘कै. गणपत गोरखे शिष्यवृत्ती’चे वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना देखील जयंती निमित्त अभिवादन यावेळी करण्यात आले.

या सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांतजी बागडे आणि UPSC परीक्षेत देशात १२५ वा क्रमांक मिळवणारे शहराचे सुपुत्र कबीर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम, नेताजी शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अपयशाला न घाबरता अभ्यासात सातत्य ठेवावे
मागासवर्गीय समाजातून पुढे येत, कठीण परिस्थितीवर मात करत यूपीएससी परीक्षेत देशात १२५ वा क्रमांक पटकावणाऱ्या कबीर कांबळे यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगितले की, यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेत केवळ १ टक्क्यांपेक्षा कमी उमेदवारांची निवड होते. ग्रॅज्युएशननंतर मी स्वतः सिव्हिल सर्व्हिस परीक्षांमध्ये सलग अपयशी झालो होतो. मात्र, मी नापास झालो तरीही माझ्या आई-वडील आणि भावाने मला मिठाई भरवून माझा उत्साह वाढवला. तसेच हाच विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार आपण सुद्धा याअगोदर घेतला होता, तो आज विद्यार्थी मित्रांना देत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनी स्व-अभ्यास आणि कुटुंबाचा खंबीर पाठिंबा या बळावरच मी कोणत्याही ट्यूशनशिवाय हे यश मिळवू शकलो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता अभ्यासात सातत्य ठेवावे. मोबाईलपासून दूर.. 12 तास 12 महिने क्लासशिवाय रोज अभ्यास, हेच माझ्या यशाचे रहस्य असे सांगत सोशल मीडियाचा वापर गरजेपुरता केल्याचं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, राजकारण म्हणजे केवळ हार-तुरे स्वीकारणे नसून ती एक कसोटी आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात आपले आदर्श योग्य ठेवले, तर यश निश्चितच मिळते; व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांनी पालकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकत स्पष्ट केले की, पालकांनी आपल्या पाल्यांना अपयशाचे स्वातंत्र्य आणि निवडीचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. मुलांशी नेहमी स्पष्ट सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. एखादा रस्ता खराब झाला तर तो पुन्हा बांधता येतो, परंतु मुलांचे शिक्षण चुकले तर पूर्ण पिढी वाया जाते. ही नवी पिढीच उद्याचा देश घडवणार असल्याने पालकांनी त्यांना योग्य वळण देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version