
घाटावर जाण्यास पोलीस प्रशासनाची बंदी ; भाविकांत नाराजी
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशी दिनी भाविकांनी श्रीचे दर्शनास हरीनाम गजर करीत रांगा लावून श्रींचे दर्शनास गर्दी केली. परिसरातून आलेल्या भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. परंपरेने श्रींचे पालखीची ग्रामप्रदक्षिणा हरिनाम गजरात, इंद्रायणी नदीला पूर आल्याने पान दरवाजा मार्ग बाधित झाला. भाविकांना गांधी रामवाड्यातील विकसित दर्शन बारीतून मंदिरात प्रवेश देण्यात आला.
भाविकांची इंद्रायणी नदीवर गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने अडथळे, दोरी लावून मज्जाव केला. नेहमी गर्दीने फुलले नदी घाट पोलीस प्रशासनाने भाविकांना नदी घाटावर जाण्यास रोखल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नदी पूर आल्याने नदी परिसरात नेहमी सारखी वर्दळ रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आली होती. आपत्ती नियंत्रण कक्षासह नगरपरिषद कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षकांनी तसेच जीव रक्षकांनी नदी घाटावर दक्षता घेत गर्दी होऊ नये यासाठी परिश्रम पूर्वक कामकाज पाहिले. तीर्थक्षेत्री इंद्रायणी नदीचे पाण्याने आचमन करीत स्थान महात्म्य जोपासण्यास काहीशी भाविकांना अडचण निर्माण झाली. आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत एकादशी दिनी ब्रम्हवृंदांचे हस्ते श्रीची पूजा, आरती, दुधारती झाली. एकादशी दिनी श्रींना फराळाचा महानैवेद्य झाला. या प्रसंगी मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणे दरम्यान भाविकांनी रस्त्याचे दुतर्फ़ा गर्दी करून दर्शन घेतले. परंपरेने हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा चक्रांकित महाराज यांचे तर्फे रुजू होत आहे. या प्रसंगी आळंदी संस्थानचे मानकरी, पुजारी, सेवक, आळंदी ग्रामस्थ, वारकरी, भाविक उपस्थित होते. मंदिरातील दर्शन बारीत रांगा लावून भाविकांनी दर्शनास गर्दी करीत श्रीचे समाधी दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. भाविकांच्या दर्शनासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले होते. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याचे नियोजन झाले. या साठी आळंदी पोलिस, मंदिरातील सुरक्षा रक्षक, सेवक यांनी दर्शन बारीसह पोलीस बंदोबस्त नियोजन केले. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे सह आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलीस यांनी सुरक्षित, सुरळीत दर्शनबारीसह, वाहतुकीचे नियोजन परिश्रम पूर्वक केले. आळंदी संस्थानसह विविध सेवाभावी संस्था व्यक्ती यांनी भाविकांना विविध फराळ पदार्थ प्रसादाचे वाटप केले. यावेळी आळंदी मंदिराचे वतीने पिण्याचे पाण्यासह इतर व्यवस्था देखील करण्यात आल्या. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात गावकरी भजन सेवा हरिनाम गजरात झाली. या वेळी माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील यांनी भाविक, ग्रामस्थ यांना फराळाचे महाप्रसाद वाटप केले. ग्रामदैवत श्री हजेरी मारुती आरती ग्रुप तर्फे श्रींची आरती हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, पसायदान हरिनाम गजर जयघोष उत्साहात करण्यात आला.
एकादशी निमित्त आलेल्या भाविक-वारकरी यांनी येथील मंदिर प्रदक्षिणा हरीनाम गजरात केली. प्रदक्षिणा मार्गावरून श्रींचे पालखीची हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा राम घाट मार्गे झाली. भाविकांची अनवाणी पायाने होणारी नगरप्रदक्षिणा प्रशस्त नगरप्रदक्षिणा मार्ग विकसित झाल्याने सुखकर झाली. एकादशी निमित्त आलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे परिसरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलले होते.
हरिपाठ कीर्तनसेवेस उत्साही प्रतिसाद
ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली. माउली मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन करीत हरिपाठ कीर्तन सेवेस भाविकांनी गर्दी केली. श्रींची पालखी आषाढी वारी निमित्त पंढरपूरला आहे. प्रस्थान झाल्यानंतर ते श्रींची पालखी आळंदीत परत येई पर्यंत येथील अवधूत चक्रांकित महाराज यांचे परिवाराचे वतीने कीर्तन सेवेची परंपरा आहे. श्रींचे विना मंडपात हरिपाठावर आधारित माउली मंदिरात कीर्तन सेवा परंपरेने रुजू होत आहे. दरम्यान प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्रींचे पालखीचे दर्शन घेतले. श्रींचे पालखीची मंदिरात प्रदक्षिणेनंतर आगमन झाले. यावेळीमानाकर यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद झाला. भाविकांचा प्रसाद वाटपास उत्साही प्रतिसाद मिळाला. भाविकांनी देखील या उपक्रमास प्रतिसाद देत उपक्रमाचे स्वागत केले. माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आळंदी स्वकाम सेवा मंडळ तसेच आळंदी देवस्थानचे सेवक,कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी विशेष सहकार्य केले. स्वकाम सेवा मंडळाचे वतीने आळंदी सह पंढरपूर आषाढी यात्रे निमित्त स्वच्छता अमृत सेवा रुजू झाल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले. सेवे पूर्वी स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सारंग जोशी यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेची तसेच आपल्या सेवेच्या उपक्रमाची शपथ देत मार्गदर्शन केले. आळंदी देवस्थान तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन परंपरेने झाले. या साठी मंदिरात संजय रणदिवे चोपदार, मनीषा यादव, अन्नछत्र प्रमुख तुकाराम माने, सेवक, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी काम पाहिले.

