Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचलनालय, महाराष्ट्र राज्य, समरसता साहित्य परिषद तसेच पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार उमा खापरे यांच्या पुढाकारातून “नारी शक्ती महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २७ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २७ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत “विठू रंग – ओवी ते दिंडी” या भव्य भजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सादर होणार असून उज्वल कवडे, प्रिया जोग, अश्विनी नाटेकर, अंजली कुलकर्णी, मंजिरी गोडबोले आणि सुषमा वैध हे कलाकार सहभाग घेणार आहेत.

२८ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पारंपरिक भव्य मंगलगौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवनी पांडे, नीता कुशारे, स्मिता कदम, साची दोषी, प्रतिभा कुलकर्णी, सिमी श्रीवास्तव, वर्षा धारणे, अर्चना गोमकाळे आणि नूतन गावडे-चव्हाण यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम सादर होणार आहे.
२९ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता महोत्सवाचा भव्य समारोप व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील समाजकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर यांच्या सुरेल गायनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
या महोत्सवाला महिला, नागरिक आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहर कोटवाणी, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version