Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवना धरणातील पाणीसाठा आता सुमारे ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असतानाही महापालिकेकडून लागू असलेली १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही पाणी कपात तातडीने रद्द करून शहराला नियमित, पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेने पाणी कपात लागू केल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः पिंपळे सौदागर प्रभागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असून, दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असल्याचे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा लक्षणीय वाढून सुमारे ९५टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्याचे कोणतेही ठोस कारण उरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे पिंपळे सौदागरसह संपूर्ण शहरातील पाणी कपात तातडीने रद्द करून नागरिकांना नियमित, पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नगरसेविका अनिता काटे यांनी केली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारा मनस्ताप लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version