Spread the love

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरी समस्या सोडविण्यावर भर द्या :- अभिषेक बारणे

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापालिका सभेत शहरातील क्रीडा सुविधा, स्वच्छता, आरोग्य, जलनिःसारण, सार्वजनिक सुविधा, माहिती-तंत्रज्ञान, स्मशानभूमी, रुग्णालय विकास तसेच विविध पायाभूत विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध करून देणे, सुरू असलेल्या विकासकामांना गती देणे आणि अत्यावश्यक सेवांमध्ये सातत्य राखणे या उद्देशाने विविध विषय सभेपुढे विचारार्थ ठेवण्यात आले.

सभेत मासुळकर कॉलनी येथील महापालिकेची व्यायामशाळा क्रीडा धोरणानुसार सेवाशुल्क तत्त्वावर ११ महिन्यांसाठी सिंहगर्जना मित्र मंडळ या संस्थेकडे चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच सुधारित क्रीडा धोरण लागू झाल्यानंतर त्यातील सर्व अटी संबंधित संस्थेस बंधनकारक राहतील, अशी तरतूदही प्रस्तावात करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी फ्लेक्स, बॅनर व स्टिकर्स तयार करण्यासाठी झालेल्या खर्चास मान्यता देण्याबाबत चर्चा झाली. तसेच स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा, वॉटर प्लस, सेवन स्टार रेटिंग, आरआरआर सेंटर्स, आयसीसीसी डॅशबोर्ड, नवी दिशा उपक्रम आणि झिरो वेस्ट स्लम मॉडेल यांसारख्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी मराठी माहितीपट तयार करण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्यात आला.

अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत व गॅस दाहिनीची देखभाल आणि संचालन अखंडित सुरू राहावे यासाठी विद्यमान कामास मुदतवाढ देणे, आवश्यक वाढीव खर्चास तसेच सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला.

ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वेताळनगर, विजयनगर, मोरयानगर, एम.बी. कॅम्प किवळे, नागसेननगर आणि रमाबाईनगर परिसरातील जलनिःसारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्राप्त निविदेस मंजुरी देऊन संबंधित ठेकेदारास काम देण्याबाबत विचार करण्यात आला.

इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भोसरी गावठाण परिसरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छता आणि देखभालीचे काम करणाऱ्या महिला बचत गटांना पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचे प्रस्तावही सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले. सार्वजनिक स्वच्छता सेवा अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहन ट्रॅकिंग व व्यवस्थापन (VTM) प्रणालीचे काम नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्यासाठी विद्यमान कंत्राटास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच मुख्य लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरीसंदर्भातील विषयांचाही सभेत विचार करण्यात आला.

आरोग्य सुविधांचा विस्तार लक्षात घेऊन थेरगाव रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील उर्वरित बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव चर्चेस आला. वाढत्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

महापालिकेच्या विविध विभागांसाठी प्रोजेक्टर व स्क्रीन खरेदीसाठी करण्यात आलेल्या निविदेअंतर्गत झालेल्या खर्चाचे अवलोकन सभेपुढे ठेवण्यात आले.

रावेत येथील स्मशानभूमी प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) आणि नीरी यांनी सुचविलेल्या निर्देशांनुसार आवश्यक बदल करून काम पूर्ण करण्यासाठी वास्तुविशारदाची थेट नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्तावही सभेत विचारार्थ ठेवण्यात आला. पर्यावरणीय निकषांचे पालन करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यावर या प्रस्तावात भर देण्यात आला.

”पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास, दर्जेदार नागरी सुविधा आणि पारदर्शक प्रशासन ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. स्वच्छता, आरोग्य, क्रीडा, जलनिःसारण, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रस्तावांमुळे नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा देण्यास मदत होईल. विकासकामांमध्ये सातत्य राखत प्रत्येक प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत आवश्यक निर्णय घेतले जात आहेत.”

• अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version