
“पुनावळ्यात कचरा डेपो उभारणे म्हणजे लाखो नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी खेळ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी”
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुनावळे येथे कचरा डेपो उभारण्याच्या मागणीवरून शहरातील राजकीय वातावरण तापले असून, या विषयावर नगरसेवक विनोद नढे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पुनावळे येथे कचरा डेपो उभारणे म्हणजे लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळण्यासारखे ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
नढे म्हणाले की, मोशीतील दुर्घटनेचे कारण पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द होणे नसून, मोशी डेपोतील कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, बायोमायनिंग प्रक्रियेतील विलंब आणि सुरक्षा उपाययोजनांतील कमतरता हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे या दुर्घटनेचे खापर पुनावळ्यावर फोडण्याचा प्रयत्न हा दिशाभूल करणारा असून, नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी काहीजण हा मुद्दा पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुनावळे, ताथवडे, वाकड आणि हिंजवडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. अशा ठिकाणी कचरा डेपो उभारल्यास दुर्गंधी, वायू प्रदूषण तसेच विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील. याशिवाय या परिसरातील पावसाचे पाणी पवना नदीत मिसळत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोठे डंपिंग यार्ड उभारण्यापेक्षा आधुनिक आणि विकेंद्रित कचरा व्यवस्थापनावर भर देण्याची गरज असल्याचे सांगत, स्थानिक पातळीवर कचऱ्यावर प्रक्रिया करणे, बायोमायनिंगला गती देणे आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प प्रभावीपणे राबविणे हा अधिक शाश्वत पर्याय असल्याचे नढे यांनी स्पष्ट केले.
मोशी दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापनात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पुनावळेच्या नागरिकांवर पुन्हा कचरा डेपो लादण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका नगरसेवक विनोद नढे यांनी व्यक्त केली.
