Spread the love

सामाजिक बांधिलकी जपत विश्वेश्वर बँकेची वाहतूक नियमांबाबत जनजागृती; चिंचवड शाखा पुन्हा नियमित सेवेत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दि विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे यांच्या चिंचवड शाखेने सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक नियमांविषयी जनजागृती अभियान राबविले. चिंचवड येथील रिव्हर व्ह्यू चौकात बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत सुरक्षित वाहनचालना आणि हेल्मेट, सीटबेल्ट वापराचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचे जीव वाचू शकतात, असा संदेश देण्यात आला. बँकेच्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे काही दिवस बंद ठेवावी लागलेली विश्वेश्वर सहकारी बँकेची चिंचवड शाखा सोमवार, दि. 20 जुलै 2026 पासून नियमितपणे ग्राहक सेवेत दाखल झाली आहे. 4 जुलैपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर 6 ते 18 जुलैदरम्यान शाखा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि लॉकरधारकांना काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागली.
या काळात ग्राहकांनी दाखविलेल्या संयम, समजूतदारपणा आणि सहकार्याबद्दल बँकेने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता आणि तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर शाखा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
सोमवार, दि. 20 जुलैपासून सकाळी 10 वाजल्यापासून शाखा नियमित वेळेत सुरू झाली असून सर्व बँकिंग सेवा पूर्ववत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बँकेने सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि लॉकरधारकांना शाखेला भेट देऊन बँकिंग सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version