
पदवीधर मतदार नोंदणी आणि रक्तदान मोहिमेला गती देण्याचे आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी १० वाजता कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे भाजपा पदाधिकारी महाबैठक पार पडली.
या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कार्याची दिशा निश्चित करण्यात आली असून, पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि आगामी रक्तदान शिबिराच्या नियोजनावर विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
बैठकीत मार्गदर्शन करताना रवींद्रजी चव्हाण यांनी पदवीधर मतदार नोंदणीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली. पिंपरी-चिंचवड शहरासाठी किमान ७५,००० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केले असून, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ नोंदणी करणे पुरेसे नसून, त्यासाठीची अचूक कागदपत्रे आणि ‘हार्ड कॉपी’ कार्यालयात वेळेत जमा करण्याची जबाबदारी संबंधितांवर सोपवण्यात आली आहे. या कामाच्या प्रगतीचा दररोजचा आढावा घेण्यासाठी एक विशेष ‘चार्ट’ तयार करून तो जिल्हा अध्यक्ष आणि गटनेत्यांकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या २० ऑगस्टपर्यंत ही मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, या कामातील सहभागाचा उपयोग भविष्यात पदांच्या वाटपावेळी निकष म्हणून केला जाईल, असा महत्त्वपूर्ण इशाराही त्यांनी दिला.
रक्तदान मोहिमेबाबत बोलताना, देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख रक्तदानाचा संकल्प पक्षाने केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या उपक्रमात पिंपरी-चिंचवडचा सहभाग म्हणून किमान ५,००० रक्तदानाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे मोठे फ्लेक्स लावून किंवा अनावश्यक जाहिरातबाजी करून वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेत शहरातील सर्व ४ सरचिटणीस, १४ मंडळांचे अध्यक्ष, २० पदाधिकारी आणि १०५ सदस्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
या बैठकीत प्रदेश सरचिटणीस राजेश जी पांडे यांनीही संघटनात्मक आढावा घेतला. रवींद्रजी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले की, नगरसेवक आणि संघटना हे वेगळे घटक नसून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. बीएलए-२ (BLA-2) चे काम पूर्ण झाले असले तरी, मतदारांचे मॅपिंग अद्याप अपेक्षित गतीने झालेले नाही, त्यामुळे पुढील १८ दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे. पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात पदवीधर मतदानाची टक्केवारी वाढवणे हे आपले महत्त्वाचे ध्येय असून, त्यादृष्टीने प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून हे दोन्ही महत्त्वाचे उपक्रम निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड जिल्हा महाबैठकीस भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आ. महेशदादा लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. शंकरशेठ जगताप, आ. अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशालीताई खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पदवीधर नोंदणी प्रमुख राजेशजी पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व मंडलाध्यक्ष, सर्व मोर्चे, आघाडी, प्रकोष्ठ, सेल यांचे अध्यक्ष, तिन्ही विधानसभांचे BLA-1 व मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या महाबैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले, सूत्रसंचालन संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी तर सरचिटणीस विकास डोळस यांनी आभार मानले.
