पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता पाचवी ते दहावीतील १०० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब वाघेरे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंतजी वाघेरे पाटील, राजेंद्रजी वाघेरे पाटील, सेवा सहयोग फाउंडेशनच्या देशमुख मॅडम आणि सुरज पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने ऋषिकेशभाऊ वाघेरे यांच्या हस्ते विद्यालयाला १५ कुशन खुर्च्यांची देणगी देण्यात आली. तसेच पूर्णम इको व्हिजन फाउंडेशनच्या वतीने सुरेश जाधव यांनी प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अशोक कापरे, आश्राप पठाण, निंबाळकर, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनकर सर यांनी केले, तर प्राचार्यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
