Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड येथील मराठी, हिंदी व अहिराणी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. संजय पवार यांना त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत नाशिक येथे ‘भारत गौरव’ पुरस्कार तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठ फेडरेशनतर्फे मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) ही पदवी प्रदान करण्यात आली.

नाशिक येथील हॉटेल रॉयल हेरिटेजच्या सभागृहात झालेल्या समारंभात आंतरराष्ट्रीय विद्यापीठ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद शांडिल्य यांच्या हस्ते डी.लिट. पदवीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते ‘भारत गौरव’ पुरस्काराची ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन प्रा. पवार यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे राज्याध्यक्ष डॉ. अजित बागमार होते. यावेळी जगद्गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, महामंडलेश्वर पुजामाई नंदगिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर ऑफ लिटरेचर, महाराष्ट्र गौरव, भारत गौरव आणि विश्व गौरव अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
प्रा. संजय पवार यांनी मराठी, हिंदी आणि अहिराणी भाषांमध्ये विपुल साहित्यनिर्मिती केली असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काही साहित्यकृतींचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. देश-विदेशात विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या प्रा. पवार यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
समारंभात डॉ. सच्चिदानंद शांडिल्य यांनी मानद डॉक्टरेटच्या महत्त्वावर प्रकाश टाकत, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान प्रेरणादायी ठरतो, असे सांगितले. कार्यक्रमास श्री. विरंजय पवार, श्री. शशिकांत निकुंभ, डॉ. जसपालसिंह वळवी, माध्यम प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version