चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेली भीषण दुर्घटना ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून घनकचरा व्यवस्थापन नियम, पर्यावरण संरक्षण कायदा आणि कामगार सुरक्षा नियमांचे कथित उल्लंघन असल्याचा गंभीर आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते, कंत्राटदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, उतारांची सुरक्षित रचना, पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कामगारांच्या जीविताचे संरक्षण करणे ही संबंधित यंत्रणांची मूलभूत जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. पाटील म्हणाले, योग्य वेळी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी झाली असती, कचऱ्याचे नियमानुसार व्यवस्थापन करण्यात आले असते आणि संभाव्य धोक्याचा नियमित आढावा घेतला गेला असता, तर निष्पाप कामगारांचे जीव धोक्यात आले नसते. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता जबाबदारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
राज्य शासनाने या दुर्घटनेची स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करावी, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय, जखमींना योग्य उपचार व नुकसानभरपाई द्यावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचे स्वतंत्र सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
मोशी दुर्घटनेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, असा इशाराही डॉ. विजयकुमार पाटील यांनी दिला.
